मुंबई | प्रतिनिधी
सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रातील शेरीनाला, वारणा उद्भव योजना तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकल्पांसाठी जागतिक बँकेकडून प्रस्तावित ६०० कोटी रुपयांच्या निधीबाबत महापौर धीरज सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी महापौरांनी शहरातील प्रलंबित विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न तसेच भविष्यातील विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधले. या चर्चेत महापालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी निधीची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सांगितले की, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून मिळणारा निधी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून त्यांनीही या प्रस्तावाला अनुकूल प्रतिसाद दिला आहे.
विशेषतः शेरीनाला प्रश्न, वारणा उद्भव योजना तसेच रस्ते व पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत कामांना गती देण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने बैठक फलदायी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
या भेटीप्रसंगी संबंधित विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती मदत मिळेल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.

