जालन्यात पुन्हा जिहादची केस:आंघोळीचे विवस्त्र फोटो काढून १० वर्षे ब्लॅकमेल

0
28

धर्मांतरासाठी बुरखा घालण्याची सक्ती; जालन्यात शेख इम्रानसह कुटुंबाविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा

: प्रतिनिधी

जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचे आंघोळ करतानाचे विवस्त्र फोटो काढून तिला तब्बल दहा वर्षे ब्लॅकमेल करत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे, तर पीडितेला हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकत बुरखा घालण्यास भाग पाडल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पारध पोलिस ठाण्यात मुख्य आरोपी शेख इम्रानसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात पोक्सो आणि अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणी ही मूळची वालसावंगी (ता. भोकरदन) येथील रहिवासी असून सध्या तिचे वय २५ वर्षे आहे. तक्रारीनुसार, फेब्रुवारी २०१६ मध्ये ती इयत्ता नववीत शिकत असताना आरोपी शेख इम्रान शेख हबीब (वय ३७) याने घरात कोणी नसल्याची संधी साधून तिचे आंघोळ करतानाचे विवस्त्र फोटो काढले. हे फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत त्याने अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, सततच्या धमक्यांमुळे आरोपीने तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केले. या त्रासाला कंटाळून पीडितेचे कुटुंब २०१७ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे राहायला गेले. मात्र आरोपीने तेथेही पाठलाग करत फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मार्च २०१८ मध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

धर्मांतरासाठी दबाव; नमाज आणि बुरख्याची सक्ती

या प्रकरणात आरोपीचे कुटुंबही सक्रिय असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आरोपीचे वडील शेख हबीब, आई शेख बानू आणि भाऊ शेख जुनेद यांनी पीडितेला मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी वारंवार प्रवृत्त केल्याचे म्हटले आहे. “तुमच्या हिंदू धर्मापेक्षा आमचा धर्म चांगला आहे,” असे सांगत तिला बुरखा घालण्यास भाग पाडण्यात आले. तसेच उर्दू आणि मराठी भाषेतील कुराण देऊन नमाज पठण करण्यास सक्ती करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

आरोपीने पीडितेला सौदी अरेबियात नोकरीचे आमिष दाखवले होते. तसेच व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर कपडे काढण्यास भाग पाडल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.

जीवे मारण्याची धमकी, अखेर पोलिसांत तक्रार

८ मार्च २०२६ रोजी आरोपीने जालन्यातील जांगडनगर परिसरातील पीडितेच्या घरात घुसून तिच्या गुप्तांगावर मारहाण केली. तसेच फोटो व्हायरल करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दहा वर्षे सुरू असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अखेर पीडितेने ५ मे रोजी पारध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here