मुंबई : बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधत नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यावरुन विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
“पक्षात कोणाला प्रवेश द्यायचा हा त्या पक्षाचा प्रश्न आहे, परंतु प्रवेश देत असताना उर्मिला मातोंडकर यांच्या प्रवेशाने महिला आघाडी मजबूत होईल अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलं. ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या रणरागिणी म्हणून शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांना जी उपमा दिली आणि ज्या रस्त्यावर आंदोलनात आघाडीवर असायच्या, तसेच ज्या घरादाराची पर्वा न करता शिवसेनेच्या वाढीसाठी लढवैय्या कार्यकत्या म्हणून काम केलं त्यांच्या कामावर पाणी फेरण्याचा प्रकार आहे,” असं प्रविण दरेकर म्हणाले.
“शिवसेनेच बदलते स्वरूप दिसतं आहे. प्रियंका चतुर्वेदी यांना खासदार केलं. आज ज्या राज्यात सत्तेत काँग्रेस आहे त्या काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवेलेल्या उमेदवाराला पक्षात प्रवेश दिला जात आहे. पक्षाची मूळ विचारधारा, आज यापलीकडे जाऊन काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाऊन केवळ सत्तेच्या समीकरणाभोवती शिवसेनेचे राजकारण फिरताना दिसत आहे,” असंही प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ज्या शिवसेनेच्या महिला आघाडीने शिवसेनेचे जीवापाड काम केलं, उदाहरणार्थ मीना कांबळी, उमेशा पवार, सुधाताई चुरी यांनी शिवसेनेसाठी रस्त्यावर काम केलं. त्यांचा शिवसेनाप्रमुखांनी सन्मान केला होता. परंतु आता उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेत प्रवेश देऊन शिवसेनेच्या महिला आघाडी कार्यकर्त्यांचे शिवसेनेने एका अर्थाने अवमूल्यन केलं आहे, असं दरेकर म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
उर्मिला मातोंडकर महाराष्ट्रासाठी चांगलं काम करतील; आदित्य ठाकरेंकडून खास शुभेच्छा
“सत्तेच्या स्वार्थासाठीच महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र आलेत”
आता शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करायला काय हरकत आहे?- अतुल भातखळकर
राष्ट्रवादीचे जयंत पाटील भाजपात येणार?; चंद्रकांत पाटील म्हणतात…