Home महत्वाच्या बातम्या मुख्यमंत्री साहेब, नक्षलवादी होण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याचं मन हेलावून टाकणारं पत्र

मुख्यमंत्री साहेब, नक्षलवादी होण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याचं मन हेलावून टाकणारं पत्र

हिंगोली : हिंगोलीमधील एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. सेनगाव तालुक्यातील ताकातोडा गावाचे रहिवाशी असणाऱ्या नामदेव पतंगे या शेतकऱ्याने हे पत्र लिहीलं आहे. या पत्रामध्ये या तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे थेट नक्षलवादी होण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केलीय.

माझे वडील, माझे आजोबाही शेतीच करायचे. मग आमचा वडिलोपार्जित व्यवसाय जर शेती असेल तर आम्हाला एक वर्षीचा दुष्काळ का सहन होऊ नये? मुख्यमंत्री महोदय तुमच्या शासन व्यवस्थेने आमच्या अंगाच्या चिंधड्या करून ठेवल्या, असं पत्रात म्हटलं आहे.

तुम्ही कर्जमाफी दिलीत पण ती आमच्यापर्यंत पोचलीच नाही, तुम्ही योजना आणली पिकेल ते विकेल पण आमच्याकडे पिकलंच नाही तर विकावं काय?, त्याचप्रमाणे पत्रामध्ये मांडण्यात आलेली कैफियत केवळ माझीच नसुन माझ्यासारख्या हजारो तरुणांची आहे, असंही पतंगे यांनी पत्रामध्ये नमूद केलं आहे.

तुम्ही पिकलं नाही म्हणुन अनुदान दिलंय. पण नुकसान एक हेक्टर आणि मदत नऊ हजार. तुमचे लाईनमन दादागिरी करायला लागेलत, न सांगताच लाईन कापत आहेत. तुमच्या बँका अजुनही शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायला तयार नाहीत. मग किमान नक्षलवादी होण्याची परवानगी तरी द्या, असं या पत्रात पतंगे यांनी म्हटलं आहे.

निसर्गाने शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. तुम्ही सांगितलेलं की पाच एकरासाठी 20 हजार रुपये देऊत पण प्रशासनाने आमच्या हाती नऊ, पाच हजार देऊन आमची बोळवण केली. महावितरणचे अधिकारी वीज कापण्यासाठी येत आहेत. आता गुरांना पाणी देण्याचा प्रश्नही निर्माण झालाय. प्रशासनाने अशी भयान परिस्थिती करुन ठेवली आहे की आता नक्षलवादी होण्याशिवाय काहीही पर्याय उरलेला नाही, असं पतंगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

दरम्यान, पतंगे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राच्या शेवटी त्यांनी स्वत:ची ओळख ‘तुमच्या महाराष्ट्रातील एक अभागी शेतकरी’ अशी करुन दिलीय.

महत्वाच्या घडामोडी –

“भारताचा स्टार गोलंदाज आर विनय कुमारची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती”

या सरकारचं कामकाज म्हणजे अजब सरकार की गजब कहाणी- सुधीर मुनगंटीवार

“संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही”

खेळपट्टी नव्हे तर सुमार फलंदाजीमुळे सामना 2 दिवसात संपला- विराट कोहली