सातारा | प्रतिनिधी
सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महायुतीतील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे. भाजपकडून धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर होताच खटाव-मानचे नेते शेखर गोरे यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेली खंत आता जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.
“साहेब, मी नक्की कुठे चुकलो?” या एका भावनिक प्रश्नाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाऊ आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या शब्दावर विश्वास ठेवत स्वतःच्या राजकीय आकांक्षा बाजूला सारणाऱ्या शेखर गोरे यांना आता विधानपरिषद उमेदवारीची संधी हुकल्याची भावना असल्याची चर्चा रंगली आहे.
गोरे कुटुंबाचे मान-खटाव तालुक्यातील राजकारणावर अनेक वर्षांपासून वर्चस्व राहिले आहे. मात्र काळानुसार दोन्ही भावांमधील राजकीय मतभेद अधूनमधून समोर येत राहिले. आता पुन्हा एकदा त्याच मतभेदांची कुजबुज सुरू झाली असून, कार्यकर्त्यांमध्येही नाराजीचे सूर ऐकू येत आहेत.
दरम्यान, “मी शांत आहे पण संत नाही” या संदेशामुळे शेखर गोरे यांनी अप्रत्यक्ष इशारा दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांमध्ये या नाराजीचे परिणाम दिसणार का, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.
राजकीय वर्तुळात आणखी एक चर्चा जोर धरत आहे. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी असलेल्या जवळिकीमुळे शेखर गोरे यांचे राजकीय वजन वाढले असल्याचे मानले जाते. अशा परिस्थितीत त्यांच्या नाराजीमुळे सातारा जिल्ह्यातील समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या एकच प्रश्न विचारला जात आहे—
“जयकुमार गोरेंच्या राजकीय उदयात सख्ख्या भावाचाच बळी गेला का?”
या प्रश्नाचे उत्तर आगामी राजकीय घडामोडींमध्ये मिळणार असले तरी, गोरे बंधूंच्या नात्यातील दुरावा आणि विधानपरिषद उमेदवारीचा वाद हा सध्या सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे.
— घडामोडी 24×7 Live

