गोपाळगड किल्ला आणि मालकी वाद
गोपाळगड किल्ला हा कोणाच्या वैयक्तिक मालकीचा नसून सातबाऱ्यावर स्पष्टपणे “महाराष्ट्र शासन गोपाळगड किल्ला” असा उल्लेख आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील अंजनवेल गाव येथील श्री. युनूस हुसैन मणियार यांचा किल्ल्याशी कोणताही संबंध नसतानाही त्यांच्या कुटुंबाने गेल्या अनेक वर्षांपासून किल्ल्यावर कब्जा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
माहितीनुसार, १९६० साली भ्रष्टाचारातून गुहागर तहसीलदार कार्यालयामार्फत खोटे कागदपत्र तयार करण्यात आले. केवळ ₹३०० मध्ये किल्ल्याच्या जागेचा लिलाव दाखवून श्री. युनूस हुसैन मणियार यांच्या वडिलांनी किल्ला विकत घेतल्याचे दस्तऐवज तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर आजपर्यंत या कुटुंबाने किल्ल्यावर बेकायदेशीर कब्जा ठेवला असल्याचा आरोप आहे.
किल्ल्याच्या परिसरात तब्बल ३१८ आंब्याची कलमे लावून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले जात असल्याचेही सांगितले जात आहे. तसेच किल्ल्याची तटबंदी तोडून त्यातील दगडांचा वापर खंदक बुजवण्यासाठी करण्यात आला असून अनेक ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. किल्ल्याच्या आत वाहनांसाठी रस्ता तयार करण्यात आल्यामुळेही किल्ल्याच्या मूळ रचनेला धक्का बसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
यासोबतच गुहागर तहसीलदार कार्यालय आणि गुहागर पोलिस स्टेशन यांनी संबंधितांना हाताशी धरल्याचा आरोप करण्यात आला आहे. आर्थिक देवाणघेवाणीमुळे कोणतीही कारवाई होत नसल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत स्थानिक लोकप्रतिनिधींचा या विषयाला पाठिंबा असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या गोपाळगड व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती ही श्री. युनूस हुसैन मणियार यांचा सुपुत्र असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून श्री. युनूस हुसैन मणियार यांच्यावर किल्ल्याचे नुकसान, बेकायदेशीर कब्जा आणि ऐतिहासिक वारशाची हानी केल्याप्रकरणी महाराष्ट्र पुरातत्व विभाग आणि केंद्रीय पुरातत्व विभागामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गिरीमित्र प्रतिष्ठान, स्थानिक गिर्यारोहक अक्षय पवार, गुहागरचे पत्रकार, किल्लेप्रेमी, अंजनवेल गावचे रहिवासी आणि काही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या प्रयत्नांमुळे अखेर सातबाऱ्यावर “महाराष्ट्र शासन गोपाळगड किल्ला” असा उल्लेख झाल्याचे सांगितले जात आहे.
– मंगेश बाळू कोयंडे
गिर्यारोहक – शिवप्रेमी – निसर्गप्रेमी
अध्यक्ष – गिरीमित्र प्रतिष्ठान

