TRTI प्रशिक्षण योजनेत अनियमिततेचा आरोप; वैभव सोलनकर यांची मुख्यमंत्र्यांकडे कारवाई करण्याची मागणी

0
106

पुणे – पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI) मार्फत राबविण्यात येत असलेल्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेत गंभीर आर्थिक व प्रशासकीय अनियमितता होत असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष वैभव सोलनकर यांनी केला आहे. वैभव सोलनकर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

सोलनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 फेब्रुवारी 2026 रोजी संबंधित प्राधिकरणाकडे सविस्तर तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर काही प्रशिक्षण संस्थांना नोटीस देण्यात आली असली, तरी ती केवळ स्पष्टीकरणापुरती मर्यादित असून कठोर कारवाईचा अभाव असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः Ignite Academy संदर्भातील तक्रारीवर कारवाई करण्यात विलंब झाल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.

या प्रकरणात शासकीय निधीचा संभाव्य अपहार, उपस्थिती नोंदीतील विसंगती, विद्यार्थ्यांची दिशाभूल, करार अटींचे उल्लंघन आणि निधीच्या वापरातील अपारदर्शकता अशा गंभीर बाबी निदर्शनास आल्याचे सोलनकर यांनी म्हटले आहे. तसेच Infinity Academy, Ignite Academy या संस्थांना आवश्यक अनुभव व सुविधा नसतानाही पोलिस भरती प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जागा देण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, संबंधित संस्थांचे एम्पॅनलमेंट स्थगित न करणे, निधी वितरणावर कोणतीही स्थगिती न लावणे, विशेष लेखापरीक्षण न करणे आणि शिस्तभंग चौकशी समिती न नेमणे या बाबींवरही सोलनकर यांनी प्रशासनावर टीका केली आहे.

या पार्श्वभूमीवर, संबंधित संस्थांचे एम्पॅनलमेंट तात्काळ स्थगित करणे, वितरित निधीचे विशेष लेखापरीक्षण करणे, दोषींवर ब्लॅकलिस्टिंगची कारवाई करणे, तसेच प्रकरण अँटी करप्शन ब्युरोकडे वर्ग करणे आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत निधी वितरण थांबविणे, अशा मागण्या सोलनकर यांनी केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here