भाजपविरोधी आघाडीचा ‘की मॅन’ काका! सांगली पॅटर्नची सूत्रे संजयकाका पाटलांकडे”

0
351

सांगली | प्रतिनिधी

सांगलीच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट (शरद पवार व अजित पवार गट) एकत्र आले आहेत. या अभूतपूर्व राजकीय एकत्रिकरणाचा समन्वयक म्हणून संजय ‘काका’ पाटील यांची भूमिका निर्णायक ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर सांगलीत एक नवा ‘पॅटर्न’ आकाराला येत असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपची वाढती ताकद रोखण्यासाठी वैचारिक मतभेद बाजूला ठेवत ही आघाडी उभी करण्यात आली असून, या संपूर्ण रणनितीची सूत्रे संजय काका पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.

‘काका द बॉस’ पुन्हा केंद्रस्थानी

लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर संजय काका पाटील यांना वैयक्तिक पातळीवर अपयश आले असले, तरी राजकीय रणनीतीकार म्हणून त्यांचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट, तीन पक्षांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आल्याने ‘काका द बॉस’ पुन्हा चर्चेत आले आहेत.जिल्हा व राज्य पातळीवरील नेत्यांशी संवाद, स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेणे आणि भाजपविरोधात संयुक्त ताकद उभी करणे, या सर्व आघाड्यांवर काका सक्रिय झाल्याचे चित्र आहे.

भाजपसमोर नवे आव्हान

आतापर्यंत विभक्त असलेली काँग्रेस व राष्ट्रवादीची दोन्ही गटांची ताकद आता एकत्र येणार असल्याने भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. नगरपालिकांपासून ते महापालिका व जिल्हा परिषद स्तरावर उमेदवारी, सत्ता-समीकरण आणि प्रचाराची दिशा या सर्व बाबींसाठी संजय काका पाटील ‘की मॅन’ ठरणार आहेत.

सांगलीत नवे राजकीय समीकरण

राजकीय विश्लेषकांच्या मते,

“संजय काका पाटील हे निवडणूक जिंकण्यापेक्षा निवडणूक जुळवण्यात अधिक पारंगत आहेत.”

त्यामुळेच तीन पक्षांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली असून, भाजपविरोधी आघाडीचा सांगली पॅटर्न यशस्वी ठरतो का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here