मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्बंधांना समाजातील काही घटकांकडून तीव्र विरोध होतोय. यावर आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लॅाकडाऊन नियमावलीचा सरकारने पुनर्विचार करावा अन्यथा जनतेतून उद्रेक होईल. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून मुंबई-पुण्यासारख्या शहरातील रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांना छोटे व्यावसायिकांसह विविध क्षेत्रातून जोरदार विरोध होत आहे., असं उदयनराजे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्य माणसांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. जर लॅाकडाऊन सारखी परिस्थिती कायम राहणार असेल तर या दरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करून जनतेला किमान दिलासा द्यावा. अन्यथा जनतेत उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही., असं उदयनराजे म्हणाले.
माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की, सरकारने पुन्हा विचार करून तसेच व्यापारीवर्गाशी चर्चा करुन त्यांना दिलासा देण्याबाबत निर्णय घ्यावा. सर्वांना विश्वासात घेऊन, गरीबांचे जीवन आणि अर्थकारणाला बाधा होणार नाही याचा विचार करावा. शेतमाल तसेच औद्योगिक मालाचा पुरवठा कायम ठेवण्यासाठी वाहतूक सुरू ठेवावी. तसेच संपूर्ण लॅाकडाऊन नियमावलीमध्ये सुसूत्रता आणून सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणावे, असंही उदयनराजे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला मोठा धक्का; विधानसभेच्या उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश
मोठी बातमी! MPSC परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार
जनमानसात अस्वस्थता..,तत्काळ पावलं उचला; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
“मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षेचा निर्णय आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार”