जळगाव : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामध्ये एका मुलाने गावात पाणी नसून भाजप आमदार गिरीश महाजन माझा फोन उचलत नाहीत, अशी तक्रार केली. त्यावर खडसेंनी बरोबर आहे, तो फक्त मुलींचेच फोन उचलतो, असं म्हणत महाजनांना टोला लगावला होता.
यावर महाजनांनीही खडसेंच्या टीकेला उत्तर देत, मी त्यासाठी एकनाथ खडसेंना दोष देणार नाही. कारण वाढतं वय, इतके आजार आणि त्यात जो माणूस मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा करत होता, त्याला आज आमदारकीही मिळत नाहीये. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं झालंय असं मला वाटतंय, असं म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. आता यावर शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देत जळगावातील लसीकरणावरून गिरीश महाजनांवर निशाणा साधला आहे.
गिरीश भाऊंना माझा सल्ला आहे. पश्चिम बंगालमध्ये अमित शाह यांनी गिरीशभाऊंना वर स्टेजवर बोलावलं होतं. जर त्याचा काही प्रभाव पडला असेल, तर जास्तीत जास्त लस जळगावसाठी आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी आणावी. गिरीशभाऊंनी आवश्यक तो लसीचा साठा महाराष्ट्रासाठी मिळवून दिला, तर त्यांचा मी भर चौकामध्ये सत्कार करीन, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
जर राज्य सरकार पूर्ण लसी घ्यायला तयार असेल, तर लस देण्याचा अधिकार कुणाला आहे, हे मी सांगण्यापेक्षा गिरीशभाऊंना चांगलं माहिती आहे. राजकारण कोण करतंय हे गिरीश भाऊंना माहिती आहे, असा टोलाही गुलाबराव पाटलांनी यावेळी लगावला.
दरम्यान, जर लसी पूर्ण उपलब्ध असल्या, तर महाराष्ट्र सरकारची आरोग्य यंत्रणा एवढी सज्ज आहे की दोन ते अडीच महिन्यांत पूर्ण राज्याला लसीकरण करू शकते. पण जोपर्यंत लसीकरणाचा कोटा आपल्याकडे येत नाही, तोपर्यंत इथे परमेश्वर जरी आला, तरी लसीकरण पूर्ण होऊ शकत नाही, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
डेव्हिड वाॅर्नरची हैदराबादच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी, ‘या’ खेळाडूकडे सोपविली कर्णधारपदाची धुरा
“सर्व काही केंद्र सरकारवर ढकलणार असाल तर राज्यकर्ते म्हणून तुम्ही काय करणार?”
“प्रसिद्ध अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनामुळं निधन”
पंजाबचा बेंगलोरवर 34 धावांनी विजय