नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळील गेट क्रमांक १ च्या बाहेर आज संध्याकाळी भीषण स्फोट झाला. हा स्फोट एका पार्क केलेल्या कारमध्ये झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्फोटानंतर कार आणि आसपास उभ्या असलेल्या तीन ते चार वाहनांना आग लागली. घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
घटनास्थळी धाव घेतली अग्निशामक दलाची
स्फोटानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. काही लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली असून, जखमींची अचूक संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
तपास सुरू – दहशतवादी कारवायांचा संशय?
दिल्ली पोलीस आणि सुरक्षा एजन्सी यांनी घटनास्थळी तातडीने नाकेबंदी केली असून, स्फोटाचे कारण शोधण्याचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात स्फोटक पदार्थाचा वापर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सुरक्षा दलांनी लाल किल्ला परिसर व मेट्रो स्टेशन परिसरात उच्च सतर्कता (High Alert) जारी केली आहे.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
या घटनेनंतर दिल्ली पोलीसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा वाहन दिसल्यास त्वरित पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे.
लाल किल्ला परिसर हा पर्यटक आणि नागरिकांसाठी गजबजलेला भाग असल्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे.
प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, “एकदम मोठा आवाज झाला आणि काही क्षणांतच ज्वाळा उठल्या. लोक घाबरून पळू लागले.” काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांची सत्यता तपासली जात आहे.
ही बातमी पण वाचा –

