पुणे – जगभरात मोठ्या उत्साहात 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल या ठिकाणी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योगाचार्य विनायक मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्वेनगर – वारजे परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट आणि सिद्धिविनायक योग प्रसारक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सदर कार्यक्रमास अनेक नागरिक उपस्थित झाले होते. प्रसन्न आणि उत्साही वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास प्रभागातील अनेक योगाचार्य, युवा, ज्येष्ठ नागरिक याचसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर योगामध्ये निपुणता प्राप्त योग खेळाडू यांनी उपस्थिती दर्शवली.

आज पर्यावरणीय समतोल बिघडत असताना धकाधकीच्या जीवनात शारीरिक तंदरुस्ती आणि मानसिक शांती दोहोंचे महत्व अनन्यसाधारण आहे. या दोन्हीचा यथायोग्य मिलाफ योगामध्ये होत असून निरोगी शरीर आणि मनासाठी योगा हा सर्वोत्तम मार्ग आहे. यामुळे अधिकाधिक नागरिकांनी योगाचा स्वीकार करत आपले जीवन आनंददायी बनवावे, हीच अपेक्षा या शिबिरातून देण्याचा आमचा मानस असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. नागरिकांना सदर उपक्रम विशेष भावला असून भविष्यातही असेच अधिकाधिक उपक्रम राबवले जातील, असेही ते म्हणाले.
