नवी दिल्ली | प्रतिनिधी
हिंदी डिजिटल पत्रकारितेतील लोकप्रिय व्यासपीठ ‘द लल्लनटॉप’ चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार सौरभ द्विवेदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तब्बल १२ वर्षे इंडिया टुडे समूहात कार्यरत असलेल्या सौरभ द्विवेदी यांच्या एक्झिटने माध्यमविश्वात चर्चेला उधाण आले आहे.
सौरभ द्विवेदी हे द लल्लनटॉप आणि इंडिया टुडे हिंदी डिजिटल या दोन्ही प्लॅटफॉर्मचे संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली लल्लनटॉपने हिंदी डिजिटल पत्रकारितेत वेगळी ओळख निर्माण केली. सोप्या भाषेत, मुद्देसूद मांडणी आणि तरुण प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारी शैली हे या प्लॅटफॉर्मचे वैशिष्ट्य ठरले.
इंडिया टुडे समूहाने अधिकृत निवेदनात सौरभ द्विवेदी यांना ‘होमग्रोन एडिटोरियल लीडर’ असे संबोधत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले आहे. लल्लनटॉपला देशातील आघाडीच्या हिंदी डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
राजीनाम्यानंतर लल्लनटॉपच्या संपादकीय जबाबदारीची सूत्रे कुलदीप मिश्रा यांच्याकडे सोपवण्यात आली असून, तर प्रॉडक्शनची जबाबदारी रजत सैन सांभाळणार आहेत. हे दोघेही लल्लनटॉपच्या स्थापनेपासून टीमचा भाग आहेत.
दरम्यान, सौरभ द्विवेदी यांनी नेमका कोणता पुढचा मार्ग निवडणार, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, ते नव्या माध्यम उपक्रमासाठी किंवा स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी तयारी करत असल्याची चर्चा माध्यम क्षेत्रात सुरू आहे.
लल्लनटॉप ही सौरभ द्विवेदी यांची वैयक्तिक चॅनेल असल्याचा गैरसमज अनेक प्रेक्षकांमध्ये होता. मात्र, हा प्लॅटफॉर्म इंडिया टुडे समूहाचा अधिकृत भाग असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

