काका? आप्पा? की याड्रावकर? — तासगाव कारखान्याच्या मालकीचा मोठा प्रश्न? शेतकरी-कामगार हवालदिल

0
212

तासगाव-:जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांत गाळप हंगाम जोमात सुरू असताना, तासगाव साखर कारखाना मात्र मालकी हक्काच्या वादामुळे ‘टोटल लॉक’ स्थितीत अडकला आहे. कोणत्याही हालचाली न दिसल्याने यंदाचा ऊस गाळप हंगाम अनिश्चिततेत लटकला असल्याचे स्पष्ट होत असून, शेतकरी आणि कामगारांच्या हाल-अपेष्टा दिवसेंदिवस वाढत आहेत.

तासगाव साखर कारखाना स्थापनेपासूनच वादाच्या भोवऱ्यात खेचला गेला आहे. अलीकडील काही वर्षांत हा संघर्ष प्रचंड चिघळला असून, त्याचा फटका थेट शेतकरी आणि कामगार वर्गाला बसत आहे. कारखाना कार्यक्षेत्रात तब्बल ७ लाख मेट्रिक टनाहून अधिक हक्काचा ऊस तयार असूनही, कारखाना सुरू करण्याबाबत कोणतीही ठोस दिशा मिळत नाही.

राजकीय नेत्यांचा संघर्ष — हंगाम धूसर

माजी खासदार संजय पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, आणि ज्येष्ठ नेते महेंद्र लाड — हे तिन्ही मोठे नेते या तिढ्याच्या चक्रव्यूहात असल्याची चर्चा कारखाना परिसरात गाजत आहे. राज्यस्तरावरही या घडामोडींचा पाठपुरावा झाल्याची कुजबुज असली तरी, तोडगा मात्र शून्य.

वादाची पार्श्वभूमी

🔹 गेल्या वर्षी संजय पाटील यांनी कारखाना भाडेतत्त्वावर पाच वर्षांसाठी राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कंपनीकडे चालविण्यास दिला.

🔹 पहिला हंगाम यशस्वी केला, मात्र त्यानंतर दोघांमध्ये गंभीर मतभेद निर्माण.

🔹 देणी आणि जिल्हा बँकेचा ताण वाढल्यानंतर संजय पाटील यांनी कारखाना महेंद्र लाड यांच्या भारती शुगर कंपनीला विक्री केला.

🔹 यड्रावकर यांनी आधी केलेल्या गुंतवणुकीवरून तिघांमध्ये संघर्ष अधिक तीव्र.परिणाम — प्रशासन मौन, आणि कारखान्याचा कागदोपत्री वर्चस्वाचा वाद ठप्प!

सर्वात मोठे बळी — उत्पादक व कामगार

कारखाना कार्यक्षेत्रात दूसरा पर्यायी कारखाना नसल्याने शेतकऱ्यांचे संकट भीषण:

▪️ ऊस दुसरीकडे पाठविण्यासाठी मोठा खर्च

▪️ तासगाव कारखान्याने उसाची नोंद घेतल्याने दुसऱ्या कारखान्याकडे पाठवण्याचा कायदेशीर पेच

▪️ वेळेत गाळप न झाल्यास उसाचे गुणवत्ता व वजन नुकसान

कामगारांचीही अवस्था तितकीच बिकट —

६०० हून अधिक स्थायी व हंगामी कामगारांचे रोजगार धोक्यात, दररोज पोटापाण्याचा प्रश्न अधिक गंभीर.

शेतकऱ्यांची एकच मागणी — “वाद बाजूला ठेवा, कारखाना सुरू करा!”

टेंभू योजनेमुळे तालुक्यातील मोठा भाग ओलिताखाली आला असून ऊस उत्पादन ऐतिहासिक पातळीवर आहे. २५ किमी परिघातच ऊस उपलब्ध असताना कारखाना बंद पडणे ही शेतकऱ्यांसाठी तगमग आणि अन्याय ठरत आहे.

कारखाना गाळप हंगाम सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा असल्या, तरी तिघांमधील वाद न मिटेपर्यंत प्रत्यक्षात गाळप सुरू होईल अशी चिन्हे दिसत नाहीत.

तिढा सुटला नाही तर — ऊस वाया, श्रम वाया, आणि संपूर्ण अर्थचक्र ठप्प!

तासगावातील शेतकरी व कामगारांच्या नशिबाचा गळीत हंगाम कोणत्या नेत्याच्या निर्णयावर थांबलेला आहे, हा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here