प्रभाग १० (ब) मधील निकालावरुन शिंदेंची शिवसेना आक्रमक, मिनल धनवटे यांचे गंभीर आरोप

0
381

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भाजपने पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळविली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनही पुण्यात स्वबळावर निवडणूक लढविली होती. उमेदवारांनी जोरदार प्रचारही केला होता. मात्र एकही जागा पुण्यात शिवसेनेची निवडणून आली नाही. पुणे महापालिका निवडणुकीच्या निकालावरुन प्रभाग १० (ब) मधील शिवसनेच्या उमेदवार मिनल धनवटे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

मिनल धनवटे म्हणाल्या, पुणे महानगरपालिका निवडणुकीत हुकूमशाहीची सुरुवात झालेली आहे. निवडणूक म्हटले की हार जीत होत असते पण पूर्ण पुण्यामध्ये शिंदेसेनेची एकही जागा न निवडून येणं हे कितपत लोकांना पटणारं आहे. पक्ष सक्षम असूनही शिवसेनेचे उमेदवार निवडून कसं येऊ शकत नाहीत. लोकांनी निवडून दिलेले उमेदवार या विरोधात ईव्हीएमने निवडून आणलेले उमेदवार, असा निकाल लागला आहे. एमआयटी इंजीनियरिंग कॉलेजमध्ये प्रभाग १० चा निकाल लागणार होता त्या ठिकाणी मोबाईल आणण्यास परवानगी नव्हती, भाजपचे सर्व कार्यकर्ते तसेच त्यांचे उमेदवार मोबाईल घेऊन तिथे उपस्थित असताना कोणीही आक्षेप घेतला नाही. निवडणूक आयोगाचे अधिकारी त्यांना स्वतः हातात हात घालून त्यांचे स्वागत करत त्यांच्याशी गप्पा मारताना दिसत होते. अशा वेळेला त्यांनी त्यांच्यावर आक्षेप घेणं अपेक्षित होतं.

एकाच पक्षाला इतके स्वातंत्र्य कसे काय दिले, त्याचबरोबर ज्या लोकांनी आयत्या वेळेला फॉर्म भरून पक्षामध्ये स्वतःची उमेदवारी घेतली, अशा व्यक्तींची ओळख नसताना ती व्यक्ती जर 24000 मतांनी निवडून येत असेल तर मात्र नक्कीच मला निकालावरुन शंका येत आहे.

गेली नऊ वर्ष प्रभाग १० (ब) मधील भाजपच्या जिंकलेल्या उमेदवाराने काही काम केलं नाही. त्यांच्याविरोधात जनतेमध्ये आक्रोश दिसून येत होता. ईव्हीएम सेटिंग न करता मी हारले असते तर पराभव स्विकारला असता. पण फक्त टेक्नॉलॉजीने जिंकून येणं हा जो पर्याय काही निवडलेला आहे, तो कोणाच्या सोयीसाठी आहे. इव्हीएम मशीनच्या बॅटरी पण काढल्या नव्हत्या.

माझे स्वतःचे मतदान न्यू इंडिया स्कूल राईट भुसारी मध्ये होते, तिथे मतदान करून मी बाहेर आल्यावर एक वयस्कर काकू भेटल्या आणि त्या म्हटल्या, मी तुम्हालाच मतदान केले. मी त्यांना धन्यवाद केले, त्या आम्हाला म्हणाल्या, की मतदान तर तुम्हालाच केले. आता यापुढची यात्रा तुम्ही कधी नेणार. लवकरात लवकर कुठेतरी चांगल्या ठिकाणी यात्रा काढा. तेंव्हा कुठे माझ्या लक्षात आले की, हे तर आमचे मतदार नसून, हे ते उपभोगी आहे ज्यांना कायम मतदानाच्या नावावर यात्रा फिरवून आणलेल्या आहेत आणि सतत यात्रेचे नियोजन त्यांच्यासाठी केले गेले असल्याने त्यांना त्यांचा उमेदवारच लक्षात नाही.

आता फक्त प्रश्न हाच आहे की पुढे या माय बाप जनतेचा नगरसेवक होणार की नगर पिता होणार. काही वर्षांपूर्वी आपल्या हिंदू हृदय सम्राट वंदनीय श्री बाळासाहेब ठाकरे यांनी नगरपिता म्हणून हे नाव नाकारलं होतं पण आता नगरसेवक हे फक्त नावालाच राहिलेला आहे तर नगरपिताच बनवून सगळे फिरत आहेत. हे मात्र सिद्ध झालेले आहे. आणि यापुढेही होणार आहे. आता जनतेची सेवा करणार की जनतेच्या डोक्यावर बसून मूग दळणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here