प्रतिनिधी-घडामोडी
शिराळा तालुक्यातील पुन्हारी गावात अंगावर काटा आणणारी, पण माणुसकीचा विजय दाखवणारी घटना घडली आहे. अवघ्या दहा वर्षांच्या शिवमने आपल्या धाडसाने बिबट्याशी थेट झुंज देत लहान बहिणीचा जीव वाचवला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शिवमच्या धैर्याची चर्चा होत आहे.
पुन्हारी येथील शेतकरी कुटुंबातील शिवम आणि त्याची धाकटी बहीण स्वराजली घराजवळ खेळत होती. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक स्वराजलीवर झडप घातली. बिबट्याने तिला ओढत नेण्याचा प्रयत्न करताच शिवम क्षणाचाही विलंब न करता बहिणीकडे धावला.
लहान वय असूनही शिवमने घाबरून न जाता बिबट्यावर दगडफेक केली, त्याला लाथा मारल्या आणि जोरजोरात आरडाओरड केली. शिवमच्या या धाडसामुळे आणि गोंधळामुळे बिबट्याने स्वराजलीला सोडून जंगलाकडे धूम ठोकली. या झुंजेत स्वराजली जखमी झाली असली तरी तिचा जीव वाचला.
घटनेनंतर जखमी स्वराजलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, या हल्ल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर भीतीचे सावट पसरले आहे.
शिराळा तालुक्यात बिबट्यांचे हल्ले वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
दरम्यान, लहान वयात दाखवलेल्या अपार धैर्यामुळे शिवम हा पुन्हारी गावाचा आणि संपूर्ण तालुक्याचा ‘शूरवीर’ ठरला आहे. बहिणीसाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या या जिगरबाज भावड्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

