मुंबई : फाटाफुटीचं हे राजकारण मी खूप पाहिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून सरकार स्थापनेचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. त्यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
30 नोव्हेंबरला पुढचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तिन्ही पक्ष पुन्हा एकदा सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करतील, असंही शरद पवार म्हणाले.
अजित पवार हे आज सकाळी सकाळी राजभवनात गेले आहेत, असं मला सहा वाजता कळलं. महाराष्ट्राच्या राजभवनाची कार्यक्षमता अचानक इतकी वाढल्याबद्दल मला आनंद झाला. मात्र, नंतर सगळ्या घडामोडींचा उलगडा झाला. अजित पवार असं काही करतील हे मलाही वाटलं नव्हतं, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आज सकाळी अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघत आहे.