मिरज-:
शहरातील शिवनेरी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभेत राजकीय वातावरण अक्षरशः तापले. नेते संजय काका पाटील यांनी थेट आणि बेधडक शब्दांत आवटी गॅंगवर कडाडून टीका करत सभेला रणभूमीचे स्वरूप दिले. “राजकारण सेवा करण्यासाठी असते, तमाशा लावण्यासाठी नाही,” असे ठणकावून सांगत त्यांनी विरोधकांची चिरफाड केली.
भाषणात आक्रमक होत संजय काका पाटील म्हणाले,
“बाया नाचवणाऱ्यांना मत देऊ नका, दलाली करणाऱ्यांना मत देऊ नका.”
जनतेच्या प्रश्नांऐवजी तमाशा, पैशांचा खेळ आणि सौदेबाजी करणाऱ्यांना आता जनता धडा शिकवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
इतक्यावरच न थांबता त्यांनी मिरजेतील जागा हडपणाऱ्या आवटी गॅंगवर थेट बोट ठेवले. “जनतेच्या मालकीच्या जागांवर डल्ला मारणारे, विकासाच्या नावाखाली लूट करणारे लोक लोकप्रतिनिधी होण्यास लायकीचे नाहीत,” असे कडक शब्दांत सांगत त्यांनी स्पष्ट केले की, अशा प्रवृत्तीला मतपेटीतून कायमची हद्दपार करा.
राजकारणाला बदनाम करणाऱ्या दलालशाही, गुंडगिरी आणि जमीन हडप प्रवृत्तीविरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर उतरल्याचे सांगत संजय काका पाटील यांनी आवटी गॅंगच्या कार्यपद्धतीवर जहरी टीका केली. “जनतेची फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
सभेत घोषणांचा पाऊस, टाळ्यांचा कडकडाट आणि प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय काका पाटील यांचा हा सडेतोड, आक्रमक आणि मसालेदार हल्लाबोल राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारा ठरला आहे.

