मुंबई | प्रतिनिधी
आगामी सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची (भाजप) उमेदवारांची यादी जवळपास अंतिम झाली असून, अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेत संभाजी भिडे यांची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संभाजी भिडे यांनी काही प्रभागांसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संभाव्य उमेदवारांची नावे सुचवली आहेत.स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकद, सामाजिक समीकरणे आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता लक्षात घेऊन ही नावे पुढे करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
भाजप व महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटप आणि उमेदवार निवडीबाबत अंतिम चर्चा सुरू असून, काही प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने निर्णय प्रक्रिया किचकट बनली आहे. मात्र, भिडे यांनी सुचवलेल्या नावांना पक्ष नेतृत्वाकडून गांभीर्याने विचारात घेतले जात असल्याची माहिती आहे.
उमेदवार यादी जाहीर होताच भाजपकडून जोरदार प्रचाराला सुरुवात होणार असून, सांगली महापालिकेवर सत्ता मिळवण्याचा पक्षाचा निर्धार स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सांगलीच्या राजकारणात आणखी घडामोडी घडण्याची शक्यता आहे…

