पुणे : महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. पुढील महिन्यात 15 तारखेला या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका घेण्यासाठी महापालिकेच्या निवडणूक यंत्रणेने तयारीला सुरुवात केली आहे. सर्व राजकीय पक्षाचे नेतेही जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते बालाजी पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची भेट घेतली आहे.
दरम्यान या भेटीत 20 मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली आहे. महादेव जाणकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होणार का? हेदेखील पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
बालाजी पवार नेमकं काय म्हणाले?
पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाची पूर्ण तयारी झाली आहे. पुण्यातील 60 जागा राष्ट्रीय समाज पक्षाच्या निवडून येतील असा मला विश्वास आहे. अनेक भागातही आमच्या कार्यकर्त्यांचे चांगलं काम सुरू आहे. नागरिकांची भाजपवर नाराजी आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत आमचे अनेक नगरसेवक निवडून येतील. आज प्रशांत जगताप यांची आज भेट घेतली. महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबतचा निर्णय लवकरच तुम्हाला कळवू.

