मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मान्यता दिली आहे. ऑनलाईन, डिजीटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर शाळा सुरु करण्यात येणार आहे, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिक्षण विभागासोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक आयोजित केली होती. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत या बैठकीत शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
शाळा सुरू करण्याचे नियोजन -:
रेड झोन मध्ये नसलेल्या 9, 10, 12 वी, शाळा-कॉलेज जुलैपासून, 6 वी ते 8 वी ऑगस्टपासून, वर्ग 3 ते 5 वी सप्टेंबरपासून, वर्ग 1 ते 2 री शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने, इयत्ता 11 वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन आहे.
पहिली, दुसरीसाठी ऑनलाईन नाही -:
ऑनलाईनबाबत पालकांच्या मतांचा विचार करण्यात आलेला आहे. पहिली व दुसरीची मुले लहान असतात, त्यांच्यासाठी ऑनलाईन पर्याय दिला जाणार नाही. ३ ते ५ वीच्या मुलांना दररोज १ तास व पुढील वर्गाच्या मुलांना दोन तासांपर्यंत ऑनलाईन, डिजिटल शिक्षण देण्याचे नियोजन आहे अशी माहिती वर्ष गायकवाड यांनी दिली.
दरम्यान महाराष्ट्र अनलॉक होण्याच्या दिशेने टप्प्याटप्प्याने वाटचाल करत आहे. ई-स्कूलमुळे विद्यार्थांना शारीरिक ताण येण्याची शक्यता व्यक्त करत काही पालक आणि संघटनांनी विरोध दर्शवला होता, मात्र कुठल्याही परीस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, ही भूमिका घेत राज्य सरकारने शाळांचे टाळे ऑनलाईन उघडले.
महत्वाच्या घडामोडी-
“पाकिस्तानातून दोन भारतीय अधिकारी बेपत्ता”
मी बरा आहे, काळजी करू नका; धनंजय मुंडेचं समर्थकांना आवाहन
चंद्रकांत पाटलांनी केलं शरद पवारांचं कौतुक; म्हणाले…
“आईसाठी सुशांतने लिहिली होती अखेरची पोस्ट