औरंगाबाद : शिवसेनेला मुख्यमंत्री देण्याचा शब्द भाजपच्या कोणत्याही नेत्याने दिलेला नाही. लोकसभेपूर्वी मातोश्रीवरील बैठकीत मी स्वत: होतो, असं वक्तव्य भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. दानवेंच्या या विधानामुळे भाजप शिवसेनेतील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकांपूर्वी मी मातोश्रीवर बैठकीसाठी गेलो होतो. त्यावेळी मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष होतो. भाजपच्या कोणत्याही नेत्याने मुख्यमंत्रिपदाबाबत शब्द शिवसेनेला दिला नव्हता. देवेंद्र फडणवीस यांनी पद आणि जबाबदाऱ्याचे समान वाटप होईल, असं म्हटल्याचं दानवेंनी सांगितलं.
राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेनेने विधानसभेचा निकाल लागल्यानंतर लगेचच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हवं अशी भूमिका बोलून दाखवली. मात्र या मागणीला भाजपने स्पष्ट शब्दात नकार दिल्यामुळे भाजप शिवसेनेतील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला होता.
दरम्यान, मंत्रिपदाच्या समान वाटपामध्ये मुख्यमंत्रिपद नाही. तर पदांच समान वाटप होईल. त्यावेळी त्यांनी अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री असा उल्लेख भाजपच्या कोणत्याही नेत्यानं केला नव्हता, असंही रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.