मुंबई-:महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे मोठी हालचाल सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता बळावत चालली आहे. या विलीनीकरणानंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्याचा आणि त्यांना थेट उपमुख्यमंत्रीपदी बसवण्याचा आराखडा तयार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
या संभाव्य राजकीय पुनर्रचनेचा थेट परिणाम महाविकास आघाडीवर होणार असून सध्याची आघाडी मोडीत निघण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपला यामधून अधिक मजबूत सहकारी पक्ष मिळेल, तर सत्तेतील समीकरणे पूर्णतः बदलू शकतात.
बारामतीच्या राजकारणातही मोठा फेरबदल अपेक्षित आहे. अजित पवार यांच्या जागी सुनेत्रा पवार पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता असून, पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा पर्यायही चर्चेत आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील राजकीय भूमिका नव्याने निश्चित होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
विलीनीकरण प्रत्यक्षात आल्यास सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद देण्याची शक्यता आहे. राज्यात जयंत पाटील, रोहित पवार, शशिकांत शिंदे आणि राजेश टोपे यांच्यासाठी सत्तेची दारे उघडली जाऊ शकतात. मात्र, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्यासारख्या नेत्यांची ताकद या नव्या रचनेत कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरेल, असे मानले जात आहे. राष्ट्रवादीची वाढ नियंत्रित ठेवत एकनाथ शिंदे गटावर दबाव वाढवण्याचा हा डाव असेल.
यासोबतच सहकार व साखर कारखाना क्षेत्रातील वर्चस्व मिळवण्याच्या दिशेनेही नवी रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. गुजरातमध्ये अमित शहा यांनी सहकार क्षेत्रातून काँग्रेसचे वर्चस्व संपवले, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सहकार क्षेत्रात नवा राजकीय प्रयोग करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या सर्व घडामोडी प्रत्यक्षात आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होईल. सत्ता, संघटना आणि नेतृत्व या तिन्ही पातळ्यांवर मोठा फेरबदल होणार असून पुढील काही दिवस निर्णायक ठरणार आहेत.
-जे निखिल

