मुंबई : अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावर अजित पवार यांनी अशी भूमिका का घेतली असावी? असे प्रश्न राज्याच्या जनतेला आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडले आहेत. यासंबंधी काही कार्यकर्त्यांनी अजित पवारांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांची भेट घेतली असता अजित पवार यांनी कार्यकर्त्यांजवळ मोठे गौप्यस्फोट केले आहेत.
राष्ट्रवादीने काही महिन्यांपूर्वीच भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. भाजपाध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका झाल्या होत्या. मात्र आता राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते मला खोटं पाडत आहेत, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते मला भेटत आहेत आणि शब्द फिरवायला सांगत आहेत, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असं कालच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.