सांगलीत कॉलेज कॉर्नरवर रक्तरंजीत थरार…..

0
364
  1. सांगली | प्रतिनिधी
    शहरातील माधवनगर रस्त्यावरील कॉलेज कॉर्नर परिसरात गुरुवारी दुपारी थरारक घटना घडली. पूर्वीच्या वादातून एका २२ वर्षीय तरुणावर धारदार हत्याराने वार करून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी कुपवाड येथील दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.विष्णू सतीश वडर (वय २२, रा. वडर कॉलनी, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे. आर्यन हेमंत पाटील (रा. रत्नदीप हाउसिंग सोसायटी, कुपवाड) आणि आदित्य प्रमोद वालकर (रा. राणा प्रताप चौक, कुपवाड) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी विष्णू वडर आणि आर्यन पाटील यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्या वादाचे पडसाद अद्याप कायम असून, याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
    गुरुवारी दुपारी वडर हा कॉलेज कॉर्नर परिसरात थांबलेला असताना पाटील हा त्याचा साथीदार वालकरसह तेथे आला. जुन्या वादातून तसेच एकमेकांकडे रागाने पाहण्याच्या कारणावरून त्यांच्यात पुन्हा शाब्दिक वाद झाला. वादाचे रुपांतर हिंसाचारात होताच पाटील याने त्याच्याकडील धारदार हत्याराने वडर याच्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत वडर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला, तर दोन्ही हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
    घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी वडर याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
    हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथके रवाना केली होती. घटनेनंतर अवघ्या काही तासांत दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात यश आले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here