मुंबई : राज्यात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचा आरोप करत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी काळे झेंडे आंदोलन केलं होतं. या आंदोलनाविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडली.
स्वत:च्या घराच्या अंगणालाच ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाही. आज, महाराष्ट्रातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलीस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करुन करोनाविरुद्ध शर्थीनं लढत असताना त्यांच्या प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी काळे झेंडे, काळे निषेध फलक फडकवून आंदोलन करणं हा समस्त करोना योद्ध्यांचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे, असं अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्र करोनाविरुद्धची एकजुटीनं लढाई लढत असताना, अशा आंदोलनातून या लढाईत अडथळे निर्माण करण्याचा, महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न राज्यातील जनताच हाणून पाडेल, असं म्हणत अजित पवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.
दरम्यान, या आंदोलनातून महाराष्ट्राचं आणि भाजपाचं काहीही भलं होणार नाही. राज्यातील प्रत्येक जण करोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देत असताना अशा पद्धतीचं ‘काळं’ आंदोलन करण्याची कल्पना कुणाच्या डोक्यात कशी येऊ शकते. हा राज्याला पडलेला प्रश्न आहे,” असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं- चंद्रकांत पाटील
साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण करा- रोहित पवार
करोनाग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या जेवणात घोटाळा- किरीट सोमय्या