मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनावेळी सभागृहात माणिकराव कोकाटे मोबाइलवर ऑनलाइन रमी खेळत असल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांच्या या व्हिडीओनंतर विरोधकांनी सरकारविरोधात टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषीखातं काढून घेण्यात आलं. यावर आता माणिकराव कोकाटे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
“राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जो निर्णय घेतला तो मला मान्य आहे. या निर्णयाप्रमाणे माझी वाटचाल सुरू असणार आहे,” असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.
दत्तात्रय भरणे हे शेतकरी पुत्र आहेत. ते मोठे आणि जाणकार शेतकरी आहेत, त्यांच्याकडे हे खाते सोपवले आहे. त्यामुळे या खात्याला निश्चितपणे न्याय मिळेल. त्या खात्यात त्यांना गरज पडली आणि त्यांनी माझ्याकडे काही मदत मागितली तर मी १०० टक्के त्यांना मदत करेन, असंही माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत.
दरम्यान, दत्तात्रय भरणे यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषीखातं देण्यात आलं आहे.