राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडीओ उघड केला होता. या व्हिडीओनंतर विरोधकांनी सरकारविरोधात टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषीखातं काढून घेण्यात आलं. अशातच आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा दावा केलाय.
अजित पवारांनी मला कृषिमंत्रीपदाची ऑफर दिली होती. भाजपसोबत सत्तेत आलो त्यावेळी कृषिमंत्रिपद घेण्यासाठी आग्रह करण्यात आला. अजित पवार माझ्यासाठी आग्रही होते, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
छगन भुजबळ यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधताना हा दावा केलाय. पुढे ते म्हणाले की, मला कृषी खाते घेण्यासाठी आग्रह केला. पण ग्रामीण भागातील लोकांना द्या, हे मी सांगितले. कारण माझे राजकारण मुंबईत झाले आहे. आम्ही शेतकरी प्रश्नावर मागे उभे राहतो. पण, त्याची बारीकसारीक माहिती देणारे माणसे ग्रामीण भागात असतात. त्यामुळे आता भरणे मामा या पदाला न्याय देतील. बालपणापासून जो ग्रामीण भागात राहिलेला आहे, तो जास्त न्याय देऊ शकतो.