कोल्हापूर : प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच पूर्ण खंडपीठात रूपांतर होणार असून, त्यासाठी राज्य शासनाने तयारी सुरू केली आहे. खंडपीठाच्या नव्या इमारतीसह न्यायमूर्तींच्या निवासस्थानांच्या बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने यापूर्वीच्या लेखाशीर्षात सुधारणा केली आहे. याबाबतचा अधिकृत आदेश विधी व न्याय विभागाकडून नुकताच जारी करण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागांतर्गत कार्यालयीन इमारतींचे बांधकाम व न्यायालयांना पायाभूत सुविधा पुरविणे ही विशेष राज्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत मुंबईतील वांद्रे येथे उभारण्यात येणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठी १२ जून २०२५ रोजी स्वतंत्र लेखाशीर्ष निर्माण करण्यात आले होते.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचला अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतर १८ ऑगस्ट २०२५ पासून या सर्किट बेंचचे प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाज कोल्हापुरात सुरू झाले आहे. सुरुवातीपासूनच कोल्हापुरात स्वतंत्र खंडपीठ स्थापन करण्याची मागणी होत होती; मात्र पहिल्या टप्प्यात सर्किट बेंचला मंजुरी देण्यात आली.
शेंडा पार्कात उभारले जाणार खंडपीठ
मुंबई उच्च न्यायालयाचे प्रस्तावित कोल्हापूर खंडपीठ शेंडा पार्क परिसरातील जागेत उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी खंडपीठाच्या इमारतीचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया राज्य शासनाच्या स्तरावर सुरू असल्याची माहिती आहे. नव्याने काढलेल्या सुधारित आदेशामुळे मुंबईतील उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीबरोबरच कोल्हापूर खंडपीठाच्या इमारत उभारणीला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्याच्या सर्किट बेंचचे टप्प्याटप्प्याने पूर्ण खंडपीठात रूपांतर करण्याचा शासनाचा मानस असून, त्यानुसार नियोजन सुरू आहे. यासाठी वांद्रे येथील उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठी ज्या राज्य योजनेअंतर्गत लेखाशीर्ष तयार करण्यात आले होते, त्यातच कोल्हापूर खंडपीठासाठी आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत.
शासनाच्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, भविष्यात कोल्हापूर सर्किट बेंचचे स्वतंत्र खंडपीठात रूपांतर होणार असून, त्यासाठी स्वतंत्र इमारत तसेच न्यायमूर्तींच्या निवासस्थानांचे बांधकाम अपेक्षित आहे. या सर्व कामांसाठी निधीची तरतूद करता यावी, यासाठीच संबंधित लेखाशीर्षात सुधारणा करण्यात आली आहे.

