पुणे : मुलांमध्ये दिवसेंदिवस मोबाईल आणि टिव्ही पाहण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. मोबाईल आणि टिव्हीवर पाहिलेल्या गोष्टींचे अनुकरण मुले करत असतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या मोबाईल आणि टिव्ही पाहण्यावर मर्यादा आणाव्यात असा मोलाचा सल्ला पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर यांनी पालकांना दिला. ते पुण्यातील गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
तत्पूर्वी या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन ओंकार साखर कारखाना समूहाच्या कार्यक्षम संचालिका रेखाताई बोत्रे पाटील, पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या उपप्रशासकीय अधिकारी शिल्पकला रंधवे, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक प्रशासकीय अधिकारी शिवाजी अढागळे, पर्यवेक्षिका स्मिता फेंगसे, मोहन कापरे आदी मान्यवर पाहुणे उपस्थित होते. यावेळी प्रशालेत विद्यार्थी केंद्रित वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याबद्दल उपप्रशासकीय अधिकारी शिल्पकला रंधवे यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकांचे याप्रसंगी कौतुक केले.
सदर स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी एकांकिका, नाटिका आणि नृत्य अविष्कारांद्वारे विविध कलागुणांचे सादरीकरण केले. यावेळी प्रशालेत घेण्यात आलेल्या कला महोत्सवातील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका जयश्री कासार यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन उपक्रमशील शिक्षक रणजित बोत्रे आणि विशाल चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन दीप्ती भगत यांनी केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका गीतांजली कांबळे, मंदाकिनी बलकवडे, रणजित बोत्रे, विशाल चव्हाण उपस्थित होते. सदर स्नेह संमेलन कार्यक्रम घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन व कलादालन येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

