भोसे गटात ‘डॉक्टर’ फॅक्टरने समीकरणे हादरली; डॉ. अमोल कोळींना शिंदे शिवसेनेचा जाहीर पाठिंबा…!

0
98
Screenshot

जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भोसे ब्लॉकमधील ११ गावांचा समावेश असलेल्या गटात राजकीय समीकरणे अचानक बदलली असून निवडणूक रिंगण तापले आहे. सुरुवातीला अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेले डॉ. अमोल बबनराव कोळी यांना उच्चस्तरीय राजकीय घडामोडींनंतर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांचा जाहीर पाठिंबा मिळाल्याने या मतदारसंघात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

या गटात भाजपकडून आशिष जाधव, तर काँग्रेसकडून दिनकर पाटील हे आधीच निवडणूक मैदानात उतरले आहेत. मात्र, शिंदे शिवसेनेच्या अचानक झालेल्या प्रवेशामुळे ही लढत आता केवळ भाजप विरुद्ध काँग्रेस न राहता शिंदे शिवसेना समर्थित अपक्ष उमेदवार विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट त्रिकोणी आणि चुरशीची लढत बनली आहे.

डॉ. अमोल कोळी हे व्यवसायाने डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते असून भोसे ब्लॉकमधील ११ गावांत त्यांनी आरोग्य शिबिरे, मोफत उपचार, गरजू रुग्णांना मदत आणि सामाजिक उपक्रमांमधून थेट जनसंपर्क निर्माण केला आहे. त्यामुळेच त्यांचा प्रभाव केवळ राजकीय न राहता सामाजिक पातळीवरही खोलवर आहे. “लोकप्रतिनिधी असा असावा” या घोषणेखाली ते मैदानात उतरले असून आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते आणि युवकांसाठी रोजगार हे मुद्दे आक्रमकपणे पुढे रेटत आहेत.

दरम्यान, भाजपचे आशिष जाधव आणि काँग्रेसचे दिनकर पाटील यांनीही प्रचार यंत्रणा पूर्ण ताकदीने राबवली असून भोसे गटात यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. शिंदे शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे कोणाचे गणित बिघडणार आणि कोणाला फायदा होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here