“बाबा, मला ते लोक त्रास देतात…” — शौर्यची अखेरची हाक; विट्याच्या पाटील कुटुंबावर दिल्लीत दुःखाचा डोंगर

0
215

दिल्लीतील सेंट कोलंबस या सीबीएससी शाळेत शिकणाऱ्या 10वीच्या शौर्य पाटीलने शिक्षिकांकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून जीव दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवार, 18 नोव्हेंबर रोजी राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनवरून उडी घेत त्याने आत्महत्या केली. शौर्यने सोडलेल्या दीडपानी सुसाईड नोटमध्ये “शिक्षिकांनी मानसिक त्रास दिल्यामुळे आत्महत्या करीत आहे,” असा थरकाप उडवणारा उल्लेखआहे.

शौर्य हा मूळचा सांगली जिल्ह्यातील ढवळेश्वर (ता. खानापूर) येथील; त्याचे वडील प्रदीप पाटील हे दिल्लीतील राजीवनगर परिसरात सोने-चांदी गलाई व्यवसाय करतात. शौर्यला डान्स, मिमिक्री आणि सांस्कृतिक उपक्रमांत विशेष रस होता; पण त्याच गुणामुळे शिक्षिकांकडून त्याला वारंवार त्रास दिला जात असल्याचे त्याने घरी सांगितले होते.

“दहा-बारा दिवस कसेही काढ” — वडिलांचा आक्रोश

वडील प्रदीप पाटील म्हणाले—

“माझा मुलगा प्रचंड संवेदनशील होता. शाळेच्या शिक्षिकांनी त्याला ‘शाळेतून काढून टाकू’ अशी धमकी दिली. त्याने हा सर्व त्रास आम्हाला सांगितला होता. सुटी लागायला दहा-बारा दिवस राहिले होते, म्हणून आम्ही त्याला ‘थोडे दिवस काढून घे’ असं सांगितलं… पण आम्ही चूक केली. माझा मुलगा परत येणार नाही. शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.”

घटनेच्या वेळी प्रदीप पाटील आई आजारी असल्यामुळे ढवळेश्वरला आले होते. माहिती मिळताच ते दिल्लीला धावले. डॉक्टरांनी शौर्यचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. गुरुवारी एअर अँब्युलन्सने त्याचे पार्थिव ढवळेश्वरला आणण्यात आले आणि शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.

चार शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल

राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी शौर्यला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल, तसेच शिक्षिका मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सोमवारी रात्रीपर्यंत हसत-खेळत संवाद

वडील प्रदीप पाटील सांगतात—

“सोमवारी रात्री आम्ही तिघे जण हसत खेळत त्याच्याशी बोललो. त्याच्या उंचीवरून आम्ही ‘भैयाऐवजी आधी तुझं लग्न करू’ अशी मस्करी केली होती. पण दुसऱ्याच दिवशी त्याने इतकं टोकाचं पाऊल उचललं…”

राजकीय पातळीवरही दखल

खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून तातडीची कारवाई मागितली आहे.

आमदार सुहास बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून “कुटुंबाला न्याय मिळवून देऊ,” अशी ग्वाही दिली आहे.

कुटुंबाची मागणी : ‘शिक्षकांवर कडक कारवाई करा’

शौर्यचे वडील म्हणाले—

“शिक्षिकांच्या त्रासाला कंटाळून माझ्या मुलानं आत्महत्या केली. त्याला न्याय मिळला पाहिजे. संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाई आणि स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here