कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी ३० एकर जमीन हस्तांतरित करण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा संकल्प केला होता. यासाठी करवीर तालुक्यातील विकासवाडी येथील ३० एकर जमीन कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला देण्यात यावी, असा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. या संदर्भात त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली होती.
त्यानुसार, ३ सप्टेंबर २०२४ रोजी मंत्रालयात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यातील विकासवाडी येथील ३० एकर जमीन कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
आज मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयास अंतिम मंजुरी देण्यात आली. त्यामुळे कोल्हापुरात लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई व पुण्यानंतर आता कोल्हापूरही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नकाशावर स्थान मिळवणार आहे.
या कोल्हापूरचे जिल्हाधिकारी व क्रीडा अधिकारी, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, एमआयडीसी प्रशासन, विकासवाडी ग्रामपंचायत व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
—

