सांगली-:मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे सध्याचे चारही माननीय न्यायाधीश मंगळवार, १६ डिसेंबर रोजी सांगली दौऱ्यावर येत असून, या दौऱ्याच्या निमित्ताने सांगली जिल्हा वकील संघटनेच्या वतीने एक विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात न्यायमूर्ती एम.एस.कर्णिक, न्यायमूर्ती शिवकुमार दिघे,न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर न्यायमूर्ती ए.एस. कडेठणकर उपस्थित राहून जिल्ह्यातील वकिलांना न्यायप्रक्रिया, न्यायालयीन कार्यपद्धती व कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन करणार आहेत.
दोन मान्यवरांचे प्रतिमापूजन-:
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूर सर्किट बेंचचे प्रवर्तक व भारताचे माजी सरन्यायाधीश न्या. भूषण गवई तसेच राज्याचे माजी मंत्री पंतकराव कदम यांच्या प्रतिमांचे अनावरण या प्रसंगी करण्यात येणार आहे. या निर्णयाची माहिती सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. अशोक वाघमोडे यांनी दिली.
कार्यक्रमाची वेळ व ठिकाण
हा भव्य कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता, सांगली जिल्हा न्यायालय परिसरातील विजयनगर येथील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास —
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. एस. के. ब्रह्मे,कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश न्या. संज्योती घरत,प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, वरिष्ठ वकील आणि तरुण अधिवक्ते उपस्थित राहणार आहेत.
तसेच सांगली वकील संघटनेचे —उपाध्यक्ष महावीर गायकवाड,सचिव दीपक कदम,यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
वकील व न्यायव्यवस्थेसाठी महत्त्वाचा कार्यक्रम
कोल्हापूर सर्किट बेंचच्या चारही न्यायाधीशांचा एकत्रित दौरा व थेट वकिलांशी संवाद हा सांगली जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील वकिलांना न्यायालयीन अनुभव, मार्गदर्शन व प्रेरणा मिळणार असून न्यायव्यवस्थेतील समन्वय अधिक बळकट होईल, असा विश्वास वकील संघटनेने व्यक्त केला आहे.

