पुणे : पुण्यातील कोथरुड परिसरातील अर्धवट राहिलेल्या ड्रेनेज कामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना होत असलेल्या नाहक त्रासाबाबत तसेच विविध कंपन्यांच्या सीसीटीव्ही केबल्स, इतर केबल्स व पाईपलाइनसाठी, रस्त्यावर करण्यात आलेल्या मनमानी खोदाईमुळे निर्माण झालेल्या राडारोडा आणि दुरावस्थेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. यामुळे परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. या प्रश्नांबाबात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे कोथरूड विधानसभा युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी क्षेत्रीय उपायुक्त सुहास जाधव यांना निवेदन दिले. मागणीची दखल घेतली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही गुरनानी यांनी दिला.
निवदेनातून अर्धवट प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, खोदाईनंतर रस्ते मूळ स्वरूपात दुरुस्त करुन जबाबदार यंत्रणा व कंत्राटदारांवर कारवाई करावी, तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी करण्यात आली. निवेदन स्वीकारताना उपायुक्त जाधव यांनी संबंधित विभागांना तातडीची सूचना देऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

