पुण्यात भाजपला धक्का बसणार! माजी शहर उपाध्यक्ष अमराळे राष्ट्रवादीच्या वाटेवर

0
194

पुणे – पुण्यात भाजपला एक धक्का बसण्याची शक्यता आहे. गेली २५ वर्ष भाजपमध्ये विविध पदांवर कार्यरत असलेले व स्वतःच्या वेगवेगळ्या उपक्रमांमधून स्वतःची ओळख निर्माण करणारे पुणे शहर भाजप माजी उपाध्यक्ष वसंत उर्फ बाळासाहेब अमराळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती त्यांच्या समर्थकांनी दिली आहे.

अमराळे यांनी २०१२ मधे महापालिका निवडणूक लढवली होती. काही मताने त्यांचा पराभव झाला होता. तेंव्हापासून त्यांना महानगरपालिका व विधानसभेसाठी भाजपकडून डावलले आहे. २०२६ च्या निवडणुकीत सुद्धा त्यांना प्रभाग १२ (छ शिवाजीनगर मॉडेल कॉलनी) मधे त्यांना डावलण्यात आले आहे. या ठिकाणी सर्वसाधारण गटात महिला उमेदवार देवून अमराळे यांच्यावर मोठा अन्याय केला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांच्या समर्थकांनी दिली आहे.

वसंत अमराळे यांनी गेली २५ वर्ष प्रभागातील नागरिकांसाठी सातत्याने देश – परदेशात ५५ यात्रांचे आयोजन केलेले आहे. त्यातून ३५००० नागरिकांनी देवदर्शनाचा लाभ घेतला आहे. मोठ्या संख्येने हळदी कुंकू, रक्षाबंधन, कोजागिरी असे समारंभ, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ३००० हून अधिक नागरिकांना व पोलिस बांधवांना वेगवेगळ्या पुरस्काराने त्यांनी सन्मानित केले आहे. पालखी मार्गावर निर्मल वारी अभियान यशस्वी करण्यात त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. दैनंदिन नागरिकांच्या अडचणी सोडवत असल्याने आणि नम्र व प्रेमळ स्वभावामुळे त्यांची मोठी लोकप्रियता या भागात असल्याचे दिसून येते. यामधून स्वतःची मोठी वोट बँक त्यांनी निर्माण केलेली आहे.

अमराळे यांच्या या निर्णयाने प्रभाग १२ च्या निकालावर परिणाम होवू शकतो हे लक्षात आल्याने राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना पक्षात घेण्यासाठी मुख्य नेत्यांकडून मोठे प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली आहे.

येत्या १० तारखेला हा पक्ष प्रवेश होवू शकतो असेही अमराळे यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. अमराळे यांना याबाबत संपर्क केला असता त्यांनी २ दिवसात याबाबत माझी भूमिका विस्तृतपणे जाहीर करेल असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here