नाशिक : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत भाजपाला मोठा फटका बसला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 तर काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या विजयासह महाविकास आघाडीच्या उमेदवाराने 6 पैकी 5 जागा जिंकल्या. यावरुन राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
काही दिवसांपूर्वी इतरांना इकडेतिकडे पाठवण्याची भाषा करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांचाच डाव उलटला आहे. पुण्यात मेधा कुलकर्णी यांच्या जागेवर ते निवडून आले. मात्र, त्यानंतर मेधा कुलकर्णी यांचे पुनर्वसन करण्यात आले नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.ते शनिवारी लासलगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यातील विधानपरिषद निवडणुकीतील पराभवातून भाजपने धडा घ्यायला हवा. त्यांनी आता जमिनीवर उतरून काम करायला हवं. देशात आता ईडी आणि सीबीआयच्या दमदाटीचे राजकारण चालणार नाही, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी यावेळी केलं आहे.
विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे चमत्कार झाला. तिन्ही पक्षांची युती झाल्यामुळे मते विभागली गेली नाहीत. या निवडणुकीच्यानिमित्ताने जनतेने महाविकासआघाडीला स्वीकारलेले दिसले. अगदी पुणे आणि नागपूर या भाजपच्या बालेकिल्ल्यातही मतदारांनी महाविकासआघाडीच्या बाजूने कौल दिला, असंही छगन भुजबळ म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत लोकांनी भाजपचा माज उतरवला- हसन मुश्रीफ
आता महाविकास आघाडीचं सरकार सांगून पाडणार नाही, थेट कृती करणार- प्रवीण दरेकर
कंगणा रणाैत म्हणजे हिमाचलचं सडलेलं सफरचंद; ‘या’ काँग्रेस नेत्याचा टोला
“पुण्यातील ‘या’ भागात उद्यापासून संचारबंदी लागू”