पुणे : प्राथमिक शाळेतील आठवणी आपल्याला चिरकाल स्मरणात राहतात. बालवयात होणाऱ्या संस्कारांचे आयुष्यात कधीच विस्मरण होत नाही. म्हणून याच काळात मुलांवर योग्य संस्कार होणे आवश्यक असते. शाळेत बालकांवर विविध प्रकारचे चांगले संस्कार होत असतात. म्हणूनच शाळा ही बालकाच्या संस्कारांचे केंद्र असल्याचे मत माजी प्राचार्य जयसिंग डोंगरे यांनी पालकांशी संवाद साधताना व्यक्त केले. ते भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर शाळेत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सदर कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांवर नृत्याविष्कार, भाषणे आणि समूहगीत गायन आदी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी हिरारीने सहभागी होऊन अत्यंत नेत्रदीपक सादरीकरण केले. यावेळी वंशिका फाऊंडेशनच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सतरंज्यांची मदत आणि खाऊ वाटप करण्यात आले. तत्पूर्वी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास शरद अध्यापक विद्यालयाचे माजी प्राचार्य जयसिंग डोंगरे, समाधान काटे, विशाल सातपुते, ज्ञानेश्वर मोरे, स्वाती वाघमारे आणि वंशिका फाऊंडेशनच्या सचिव रेश्मा सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवर पाहुण्यांचे ढोल ताशाच्या गजरात शाळेच्या लेझीम पथकाने स्वागत केले.
सदर कार्यक्रमाची संकल्पना उपक्रमशील शिक्षक रणजित बोत्रे यांची होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली गावडे यांनी केले. ध्वज प्रतिज्ञा विशाल चव्हाण यांनी म्हणून घेतली. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका जयश्री कासार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गीतांजली कांबळे आणि मंदाकिनी बलकवडे, रणजित बोत्रे, विशाल चव्हाण यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, नागरिक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.