पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भाजपने पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळविली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनही पुण्यात स्वबळावर निवडणूक लढविली होती. उमेदवारांनी जोरदार प्रचारही केला होता. मात्र एकही जागा पुण्यात शिवसेनेची निवडणून आली नाही. पुणे महापालिका निवडणुकीच्या निकालावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील युवा सेनेचे राज्य समन्वयक अनिकेत जावळकर यांनी आक्षेप घेतला आहे.
अनिकेत जावळकर यांच्या वहिनी प्रतिक्षा विनोद जावळकर या प्रभाग ३० मधील शिवसेनेच्या उमेदवार होत्या. मात्र त्या पराभूत झाल्या आहेत. यावरुन अनिकेत जावळकर यांनी निकालावर आक्षेप घेतला आहे. रविवारी दुपारी कर्वेनगर या भागात अनिकेत जावळकर यांच्या उपस्थित बेठक झाली. या बैठकीत प्रभाग ३० मधील अनेक नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेक नागरिकांनी भुमिका मांडली. इव्हीएममध्ये घोळ केल्याचा आरोप जावळकर यांनी केला आहे. तसेच निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

