मारुती चौक पुन्हा तापणार; बावडेकर विरुद्ध पवार गट
सांगली | प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीतील विजयाचा जल्लोष थेट राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. गावभाग वार्ड क्रमांक १४ मधून विजयी झालेले युवराज बावडेकर यांनी विजयानंतर थेट मारुती चौकात येऊन जोरदार ‘शड्डू’ ठोकत आपली ताकद दाखवली. या घटनेनंतर मारुती चौक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
युवराज बावडेकर हे पूर्वी जुने भाजप कार्यकर्ते व संभाजी पवार गटाचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र गेल्या काही वर्षांत बावडेकर आणि पवार गटामध्ये मतभेद तीव्र झाले. याच पार्श्वभूमीवर २०२६ च्या महापालिका निवडणुकीत पवार गटाकडून युवराज बावडेकर यांना तिकीट नाकारण्यात आले.
तिकीट नाकारल्यानंतर बावडेकरांनी थेट शिंदे गटाच्या सेनेत प्रवेश केला. प्रवेशानंतर त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांनी निवडणूक जिंकून दाखवत आपल्या राजकीय ताकदीचा ठसा उमटवला. दुसरीकडे पवार गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची करत पूर्ण ताकद लावली होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
दरम्यान, निवडणुकीदरम्यान बावडेकरांनी ‘गद्दारी’ केल्याचा गंभीर आरोप पवार गटाकडून करण्यात आला आहे. गौतम पवार यांनी जयंत पाटील तसेच काँग्रेस नेत्यांच्या मदतीने बावडेकरांनी खेळी केली, असा दावा करत काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. या आरोपांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
विजयानंतर युवराज बावडेकर थेट पवार गटाच्या कार्यालयासमोर आले आणि तिथेच विजयाचा शड्डू ठोकत शक्तिप्रदर्शन केले. या कृतीने पवार समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, भविष्यातील राजकीय संघर्षाची नांदी ठरल्याचे बोलले जात आहे.
आता गावभागच्या राजकारणात युवराज बावडेकर विरुद्ध गौतम पवार व पृथ्वीराज पवार असा थेट संघर्ष पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मारुती चौक पुन्हा एकदा राजकीय रणभूमी ठरणार का, याकडे संपूर्ण सांगलीचे लक्ष लागले आहे.

