घडामोडी-विशेष
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली असून, भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून, त्यांनी उमेदवारी अर्ज खरेदी करून आपली राजकीय तयारी स्पष्ट केली आहे. अधिकृत उमेदवारी जाहीर होणे बाकी असले तरी, त्यांच्या एन्ट्रीमुळे भाजपच्या रणनीतीला वेग आला आहे.
महापौर पद ओपन; कृष्णराज महाडिक ‘फ्रंट रनर’?
यंदाच्या महापालिका कार्यकाळासाठी महापौर पद सर्वसाधारण (Open) प्रवर्गासाठी राखीव असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजपला बहुमत किंवा आघाडी मिळाल्यास कृष्णराज महाडिक हे कोल्हापूरचे पुढील महापौर होऊ शकतात, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विशेष म्हणजे, कृष्णराज महाडिक हे तरुण, अभ्यासू आणि नव्या पिढीचे नेतृत्व म्हणून ओळखले जात असून, भाजपकडून त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपची रणनीती, नव्या नेतृत्वावर भर
भाजपकडून यंदाच्या महापालिका निवडणुकीत तरुण आणि प्रभावी चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती आखली जात असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर कृष्णराज महाडिक यांचा राजकारणातील प्रवेश हा भाजपसाठी निर्णायक ठरू शकतो.
धनंजय महाडिक यांच्या राजकीय अनुभवाचा फायदा आणि स्थानिक संघटनात्मक ताकद लक्षात घेता, कृष्णराज महाडिक यांची उमेदवारी ही भाजपसाठी ‘गेम चेंजर’ ठरेल, असा दावा समर्थकांकडून केला जात आहे.
-जे निखिल

