सांगली / नागपूर :नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधानसभेत पोलिसांच्या निष्क्रियतेवर टीका करताना वापरलेल्या एका शब्दप्रयोगामुळे निर्माण झालेल्या तीव्र वादानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी तातडीने जाहीर दिलगिरी व्यक्त केली. “हजामत” हा शब्द बोलण्याच्या ओघात वापरला गेला असून, त्यामुळे नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मी संपूर्ण समाजाची माफी मागतो, असे स्पष्ट शब्दांत पाटील यांनी सांगलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.
काय होता वाद?
नागपूर हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी राज्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर जोरदार टीका केली होती. बीड जिल्ह्यातील राम खाडे यांच्यावर नगर जिल्ह्यात झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा संदर्भ देत त्यांनी सरकार आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. “राम खाडे यांच्यावर १० ते १२ जणांनी अमानुष हल्ला करून हात-पाय तोडले. त्यांना मेले समजून फेकून दिले. या घटनेला १५ दिवस उलटूनही पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केलेली नाही. मग पोलीस काय हजामत करतात का?” असा सवाल करत त्यांनी संताप व्यक्त केला होता. या शब्दप्रयोगावर सत्ताधारी पक्षांनी तीव्र आक्षेप घेत सभागृहात गोंधळ घातला.पोलीस काय हजामत करतात का?’ विधानावर वाद; जयंत पाटील यांची नाभिक समाजाची जाहीर माफी, निवडणूक आयोगावरही साधला निशाणा
नाभिक समाजाची जाहीर माफी
या वादानंतर जयंत पाटील यांनी आज सांगलीत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.ते म्हणाले, “माझा उद्देश केवळ पोलिसांच्या कामकाजावर टीका करण्याचा होता. कोणत्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. मात्र बोलण्याच्या ओघात ‘हजामत’ हा शब्द माझ्याकडून वापरला गेला. त्यामुळे नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी संपूर्ण समाजाची जाहीर माफी मागतो. अशी चूक व्हायला नको होती.”
निवडणूक आयोगावरही टीका
याच पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आयोगाकडून पत्रकार परिषदेची वेळ आणि तारीख जाहीर झाल्यानंतरच घाईगडबडीने निर्णय घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.निवडणूक आयोगाने अधिक पारदर्शकता आणि स्पष्टता ठेवली पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
सांगली महापालिका निवडणूक महाविकास आघाडीत
दरम्यान, जयंत पाटील यांनी एक महत्त्वाची राजकीय घोषणा करत सांगितले की, सांगली महानगरपालिकेची आगामी निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. यामुळे स्थानिक राजकारणात नव्या हालचालींना वेग आला आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा
जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद, त्यानंतरची माफी आणि निवडणूक आयोगावर केलेली टीका यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असली, तरी माफी मागून पाटील यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

