मुंबईत बंद करण्यात आलेल्या कबुतरखान्यांचा मुद्दा पुन्हा पेटण्याची शक्यता वाढली आहे. जैन मुनी निलेशचंद्र यांनी आज पत्रकार परिषदेत आक्रमक भूमिका घेत घोषणा केली — “मुंबईत कबुतररक्षक तयार करू… जीवदयेच्या लढ्याला आता थांबा नाही!”
❗पार्श्वभूमी
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दादरसह शहरातील कबुतरखाने बंद करण्यात आले.कोर्टाने या कबुतरखान्यांमुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो असे नमूद केले होते. त्यानंतर जैन समाजाकडून आंदोलन आणि निषेध व्यक्त झाले, परंतु खटल्याच्या कारणास्तव कबुतरखाने पुन्हा सुरू झाले नाहीत.
🟢 पुन्हा संघर्ष तापतोय
आज जैन मुनी निलेशचंद्र यांनी स्पष्ट इशारा दिला —“कबुतरखान्यांचा मुद्दा जीवदयेशी संबंधित आहे. प्रत्येक इमारतीत जाऊन जैन समाज संघटित करणार. दादर कबुतरखान्याजवळ उपोषण करू.”ते पुढे म्हणाले —“जीवदयेचा विचार करणाऱ्यांनाच मुंबई महानगरपालिकेत निवडून देऊ.”
⚠️ राजकीय संकेत आणि मोठा दावा-: दादर कबुतरखाने सुरू करण्यासाठी राज्य सरकारातील मंत्री मंगलप्रभात लोढा आग्रही असल्याची चर्चा होती. पण निलेशचंद्र यांनी प्रत्यक्षात लोढा आमच्यासोबत नाहीत असा दावा केला.
त्यांनी सांगितले —जैन समाज आमच्यासोबत आहे. घराघर जाऊन जागृती करणार आणि उपोषण सुरू करू.”
🕊️ “गोरक्षकाप्रमाणे कबुतररक्षक”
निलेशचंद्र मुनी यांचे सर्वाधिक चर्चेत राहिलेले विधान —“मी अमरावतीचा आहे. तिथे आम्ही गोरक्षक तयार केले—त्यात 10-15 जखमी झाले. आता मुंबईत कबुतररक्षक तयार करणार.”
🔥 मराठी भाषेबाबतही थेट विधान
मुनी निलेशचंद्र यांनी भाषिक प्रश्नालाही एक वळण दिले —“राजस्थानी लोक महाराष्ट्राचा सन्मान जास्त करतात. मराठी माणसाने भेंडीबाजारात जाऊन मराठीचा आग्रह धरावा.”
महापालिका निवडणूक जवळ येत असताना जैन समुदायाचा हा आक्रमक पवित्रा राजकारणाला नवी दिशा देऊ शकतो. कबुतरखान्यांच्या बंदीवरून सुरू झालेला वाद पुन्हा भडकण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

