तासगाव – प्रतिनिधी
तासगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला जोर पकडला असून आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दिवसभर भव्य जनसंपर्क दौरा पार पडला. शहरातील विविध प्रभागांमध्ये आमदार पाटील यांनी घर ते घर भेट देत मतदारांशी संवाद साधला, नागरिकांच्या मागण्या व समस्यांची माहिती घेतली आणि विकासकामांचा आढावा घेतला.
“ घरी जेवण “
मोहिमेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी जवळीक राखत त्यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जेवण केले,ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि भावनिक वातावरण निर्माण झाले. अनेक कुटुंबांनी घरच्या घरी आमदारांचे स्वागत करत समर्थन दर्शविले.
“ दहशतीत मोठे पाठबळ-“
या दौऱ्यात आमदार रोहित पाटील यांनी कार्यकर्त्यांना आत्मविश्वास व धीर देणे या गोष्टीवरही विशेष भर दिला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण आणि दहशतीच्या वातावरणातही कार्यकर्त्यांनी खचून न जाता ठामपणे काम करावे, असा संदेश त्यांनी दिला. “तुम्ही प्रत्येकजण माझ्या परिवाराचा भाग आहात. कोणीही घाबरण्याची गरज नाही. मी तुमच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा आहे,” असे आश्वासन पाटील यांनी देताच कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
या जनसंपर्क दौऱ्यादरम्यान नागरिकांनी रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि रस्त्यावरील प्रकाशयोजना यासंबंधी काही प्रश्न मांडले. संबंधित अधिकाऱ्यांकडे तातडीने निर्देश देऊन नागरिकांच्या समस्यांच्या त्वरित निवारणासाठी आमदारांनी पुढाकार घेतल्याचे प्रत्यक्ष पाहायला मिळाले. काही प्रभागांत महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी भेटीसाठी उत्साहाने प्रतिसाद दिला.
प्रचारात युवक व महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून आला. अनेक ठिकाणी नागरिकांनी आमदारांसोबत छायाचित्रे काढत समर्थन व्यक्त केले. संपूर्ण शहरात निवडणुकीचे वातावरण जोरदार रंगत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या दौऱ्यात आमदार रोहित पाटील यांच्यासोबत स्थानिक पदाधिकारी, विविध संघटनांचे सदस्य, युवा कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
“ आम्ही भाग्यवान “
आम्ही फक्त आबांना टीव्ही वर पाहत होतो पण आज त्यांचे सुपुत्र आमदार रोहित पाटील आमच्या घरी मुक्काम ला आहेत. आम्ही खूप भाग्यवान आहे असा सय्यद व पवार कुटुंबाच्या वतीने सांगण्यात आले…

