चंद्रपूर : शिवसेना-भाजप युतीच्या विजयी उमेदवारांच्या यशात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा वाटा होता. मात्र युती उमेदवारांच्या विजयात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे योगदान नाही, अशी टीका राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अडीच तास मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान पवारांनी भाजपचे 105 आमदार जिंकण्यात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. शिवसेना सोबत नसती तर 105 चा आकडा 40-50 असता, असं वक्तव्य केलं होतं.
भाजपच्या 105 जागा शिवसेनेमुळेच आल्या असं विधान शरद पवारांनी मुलाखतीदरम्यान केले. मात्र 2014 मध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. याकडे पवारांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले, असं मुनगंटीवार म्हणाले.
भाजप आणि शिवसेनेचे विचार समान नव्हते हे शरद पवार यांचे विधान आश्चर्यजनक आहे. गेली 30 वर्षे आम्ही सोबत होतो. समान तत्त्वावर निवडणुकाही लढवल्या आहेत. मात्र 194 दिवसातच शिवसेना आणि काँग्रेसचे विचार एक झाले याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.