मुंबई | मला रात्री बारा वाजता फोन आला, सकाळी सात वाजता मुंडे यांच्या बंगल्यावर गेलो, त्यावेळी 10 ते 11 आमदार आले. आम्हाला कुठलीही कल्पना नव्हती, आम्हाला तिथं राजभवनावर नेलं, शपथविधी झाल्यावर मी थेट पवारांच्या बंगल्यावर गेलो, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे आणि संदीप क्षिरसागर यांनी दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सकाळी घडलेल्या घटनेवर भाष्य केलं आहे. अजित पवारांच्या सांगण्यावरुन राष्ट्रवादीचे 10 ते 11 आमदार राजभवनावर गेले होते. मात्र, त्यांना काय घडणार याबाबत कल्पना नव्हती, असं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं आहे.
अजित पवार यांचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाच्या धोरणाच्या एकदम विरोधात आहे. प्रामाणिक कार्यकर्ता अजित पवारांसोबत जाणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जर आमदार फुटणार असतील तर त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्याने कारवाई होईल, असंही शरद पवार म्हणाले आहेत.