इंदूर : भारतीय संघाने पहिल्या कसोटीत बांगलादेशचा धुव्वा उडवला आहे. भारताने या सामन्यात एक डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला. कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी विजय मिळवत भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आघाडी मिळवली.
भारताने बांगलादेशवर 343 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारताच्या वेगवान माऱ्यासमोर बांगलादेशी फलंदाजीचा निभाव लागला नाही. बांगलादेशचा दुसरा डाव 213 धावांवर आटोपला. भारताकडून मोहम्मद शमीने 4 विकेट घेतल्या तर बांगलादेशकडून दुसऱ्या डावात मश्फिकूर रहीमने सर्वाधिक 64 धावा केल्या.
सलामीवीर मयांक अग्रवालने 243 धावांची खेळी केली. रोहित शर्मा अवघ्या सहा धावा करून बाद झाला. चेतेश्वर पुजाराने 54 धावा करून चांगली साथ दिली. कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाला. अजिंक्य रहाणेने 86 धावा केल्या. तर अष्टपैलू रवींद्र जडेजाने 60 धावांची चांगली खेळी केली. उमेश यादवने 25 धावा केल्या. बांग्लादेशकडून अबु झायेदने 4 बळी घेतले.