सांगली | प्रतिनिधी
सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारयंत्रणा वेगात सुरू असली, तरी काही प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांची नाराजी उघडपणे समोर येत आहे. उमेदवारांकडून वारंवार फोन, निरोप आणि भेटीगाठी होऊनही अनेक कार्यकर्ते प्रचारापासून अलिप्त राहिल्याचे चित्र आहे.
नाराजीमागील प्रमुख कारण म्हणजे प्रचार यंत्रणा थेट स्थानिक कार्यकर्त्यांच्या हातात न राहता ती दुसऱ्याच गटाच्या किंवा बाहेरील लोकांच्या ताब्यात गेली असल्याची भावना. “ज्यांनी पक्ष वाढवला, निवडणुकांमध्ये रस्त्यावर काम केले, त्यांनाच बाजूला ठेवण्यात आले,” अशी दबक्या आवाजात नाराजी व्यक्त केली जात आहे.
काही कार्यकर्त्यांचा दावा आहे की निर्णयप्रक्रिया, प्रचार नियोजन, निधी वाटप आणि संपर्क यंत्रणा मोजक्याच लोकांच्या हातात केंद्रीत झाल्याने जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते डावलले गेले आहेत. त्यामुळेच अनेक जण प्रचारात सक्रिय भूमिका घेण्यास तयार नाहीत.
“२०–२० वेळा फोन करूनही प्रतिसाद मिळत नाही. आधी आम्ही प्रचाराची सूत्रे हातात घेत होतो, मात्र आता सर्व यंत्रणा दुसऱ्याच हातात गेली आहे,” अशी खंत काही उमेदवारांनी खासगीत व्यक्त केली.
राजकीय विश्लेषकांच्या मते, ही नाराजी वेळीच दूर न झाल्यास त्याचा थेट परिणाम मतदानावर होऊ शकतो. ‘विरोधकांच्या आघाडीला संधी देऊ नका’ असे आवाहन जरी केले जात असले, तरी नाराज कार्यकर्त्यांचा विश्वास पुन्हा मिळवणे हेच सध्या सर्वात मोठे आव्हान ठरत आहे.
सांगलीतील निवडणूक जरी रंगात आली असली, तरी यंत्रणेवरील वर्चस्वाच्या वादामुळे प्रचारात अस्वस्थता कायम असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

