वार्ड नं. ११ मधील संजयनगर भयमुक्त करण्यासाठी घरचा उमेदवार; विशाल पाटील यांचा दहशतीविरोधात घणाघात

0
109

सांगली | प्रतिनिधी

वार्ड क्रमांक ११ मधील संजयनगर परिसर भयमुक्त करण्यासाठी काँग्रेसकडून स्थानिक, घरचा उमेदवार देण्यात आल्याचे स्पष्ट करत विशाल पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. “संजयनगरमधील दहशत मोडून काढणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे,” असे ठामपणे सांगत त्यांनी आक्रमक भूमिका जाहीर केली.

यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले, “आम्ही ज्यांना पोसले, ज्यांना मोठे केले त्यांनीच आमच्यावर डगफटका केला. अशा लोकांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे.” या शब्दांतून त्यांनी अंतर्गत विश्वासघात आणि गटबाजीवर थेट निशाणा साधला.

संजयनगरमध्ये भीती निर्माण करून राजकारण करणाऱ्यांना आता जनता धडा शिकवेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी लोकशाही मार्गाने, जनतेच्या ताकदीवर दहशत संपवली जाईल, असेही स्पष्ट केले. विकासकामे, पारदर्शक कारभार, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य आणि स्थानिक प्रश्नांचे तत्काळ निराकरण हीच काँग्रेसची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रचारादरम्यान संजयनगरमधील नागरिकांचा वाढता प्रतिसाद दिसून येत असून “दहशत नको, विकास हवा” अशी ठाम भावना मतदारांमध्ये निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे वार्ड नं. ११ मधील ही निवडणूक केवळ सत्तासंघर्ष न राहता भयमुक्त संजयनगर विरुद्ध दहशतीचे राजकारण अशी बनल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

विशाल पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे वार्ड नं. ११ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून येणाऱ्या दिवसांत प्रचार आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here