सांगली | प्रतिनिधी
भव्य पोस्टर्स, महागडी वाहने आणि मोठमोठ्या घोषणा यांपासून दूर राहून केवळ लोकांच्या विश्वासावर उभा राहिलेला उमेदवार म्हणून सराफ कट्ट्यातील सुधीर कस्तुरे सध्या सांगलीत चर्चेचा विषय ठरत आहेत. वॉर्ड क्रमांक १४ मधून महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले कस्तुरे हे नाव आज जनतेच्या ओठांवर आहे.
सराफ कट्ट्यातील दुकाने झाडणे, परिसर स्वच्छ ठेवणे, भेटणाऱ्या प्रत्येकाला नम्र नमस्कार करणे आणि कपाळावर संस्कृतीचा वारसा जपत वावरणारा हा युवक कोणत्याही राजकीय घराण्यातील नाही. तो आहे लोकांमधून उभा राहिलेला सामान्य माणूस. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सरळ स्वभाव हीच त्यांची खरी ओळख बनली आहे.
प्रचारासाठी मोठ्या आर्थिक बळाऐवजी सराफ कट्ट्यातील नागरिकांनी लोकवर्गणीतून पाम्पलेट व प्रचार साहित्य उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचाराला केवळ आर्थिक पाठबळच नाही, तर लोकांचा थेट सहभागही लाभत आहे.
सामाजिक बांधिलकी ही केवळ बोलण्यात नाही तर कृतीतून दिसते. गवळी गल्ली येथे मृत अवस्थेत पडलेले गाढवाचे पिल्लू हटवण्यासाठी एकही नगरसेवक पुढे न आल्याने, सुधीर कस्तुरेंनी स्वतः सायकलवरून ते नदीकाठी नेऊन अंत्यसंस्कार केले. जैन बस्ती व गवळी गल्लीतील रस्त्यांची कामे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून पूर्ण करून घेण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे.
श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीच्या निमित्ताने घरोघरी बेलपत्र वाटप करून त्यांनी विशेषतः महिला वर्गात वेगळी ओळख निर्माण केली. महाप्रसाद, धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. परिसरात कुणाचाही मृत्यू झाल्यास आवश्यक साहित्य आणण्यापासून ते प्रत्येक कामात ते अग्रेसर असतात.
अत्यंत गरीब परिस्थितीतही, रात्री-अपरात्री कुणीही मदत मागितली तर ते मदतीला धावून जातात. गाडी किंवा मोबाईल नसतानाही सायकलवरून परिसर पिंजून काढत प्रश्न सोडवण्याची जिद्द हीच त्यांच्या कार्यपद्धतीची ओळख आहे.
असा हा सामान्य, गरीब पण मनाने श्रीमंत उमेदवार आज कोणत्याही मोठ्या राजकीय पाठबळाशिवाय लोकांच्या विश्वासावर निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. सराफ कट्ट्यातून सुरू झालेली ही लोकशक्तीची लढाई निवडणुकीत कोणता निकाल लावते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

